Wednesday 1 May 2019

दररोज नवीन भासणारा चिरतरुण रंकाळा.

दररोज नवीन भासणारा चिरतरुण रंकाळा...

कोल्हापूर म्हणजे रांगडेपणा..हा रांगडेपणा अबाधित ठेवायचं काम इथल्या मातीतल्या प्रत्येक पेठेच्या तालमीच्या कट्ट्यावर सालाबादप्रमाणे आणि वर्षानुवर्षे होत आहे ..ते कायमचंच आहे अखंडित कोल्हापूरचा बाणा जपणार...तर या कट्टयावर गप्पाचा फड रंगला की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि फुटबॉल पासून आय पी एल पर्यंत सगळ्या चर्चाचा पेव फुटलेला...चर्चेचा शेवट खर कायम राजकारणात कारण हा विषय चवीनं हाताळण्याची कोल्हापूरकरांच्यात खुबीच आहे म्हणा...इथल्या राजकारणाची इर्षा तर पार टोकाची पण कोल्हापुरान कायम चांगलं काम करणाऱ्या कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला डोक्यावर घेतलं.


तर सांगायचं तात्पर्य हे की या करवीर नगरीत एक मोठा कट्टा साकारला हाय आमच्या शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतन...लयी पैलवान गडी , मावळ तयार झाल्यात या कट्टयावर..कट्ट्याची लांबी भली मोठी मैल दोन मैल अगदी शालिनी पॅलेस पर्यंत ....मंडळी ओळखलं नव्ह आपला रकाळा ओ...हे हे आपल्या पेठेतल्या भाषेत रकाळाच, रंकाळा नव्ह...

आई अंबाबाईच्या परड्यात म्हणायला हरकत नाही असा हा रंकाळा..या रंकाळ्यातल दगड अंबाबाई च मंदिर बांधताना वापरलं अशी अख्यायिका इथली जुनी जाणती माणस सांगतात. इथल्या प्रत्येक माणसाबरोबर हा रंकाळा बोलत राहतो पण त्याच म्हणणं ऐकायला आपल्याला कुठं वेळ आहे..म्हणूनच मुद्दाम या रंकाळाच्या कट्ट्यावर आलोय त्याच्याशी बोलायला आणि आठवणीत रमायला...

रंकाळा तलावाचे कोल्हापूरकरांनी सोईस्कर असे 4 भाग केले आहेत.

पहिला भाग म्हणजे जुना रंकाळा - संध्यामठ, रंकाळा टॉवर राजघाट रोड ते शालिनी पॅलेस पर्यंत ,
दुसरा भाग - नवा रंकाळा - अंबाई टँक पासून , परताळा ते पोहायची पतोडी खणीपर्यत ,
तिसरा भाग - पक्षी निरीक्षण केंद्र ते क्रशर इराणी खण , मत्स्यबीज केंद्रापर्यतचा आणि
चौथा भाग राजकपूर यांच्या पुतळासमोरील बाग ,तांबट कमान ते संध्यामठ पर्यंतचा...
सांगायच कारण म्हणजे या प्रत्येक भागामध्ये विभागलेला रंकाळा कुठूनही बघितला तरी आपलासा वाटतो अगदी त्याच्या विशाल आकाराच्या हृदयासारखा....एवढं लिहायचं कारण एकच या आमच्या कोल्हापूरकरांच्या रंकाळाचा श्वास गुदमरतोय, त्याच मूळ अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड सुरू आहे. अगदी केंदाळच अतिक्रमण ते सांडपाण्याचा मारा अखंडपणे झेलत...आज पर्यटकांना आम्हाला सांगताना लाज वाटते की 60 च्या दशकामध्ये या रंकाळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरत होते.

तर मंडळी याच रंकाळाचा सगळ्या भागांचा आढावा घेऊयात..

भाग एक मध्ये असणारा संध्यामठ...रंकाळ्यामध्ये असणाऱ्या विशाल खडकावर साकारलेला वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना. प्रत्येक ऋतुत याचे सौन्दर्य वेगळे असते. खांबावर साकारलेले सुंदर नक्षीकाम आणि त्याच्या गर्भात साकारलेला फक्त उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर दर्शन देणारा गणपती दिसला की मन प्रसन्न होत. तिथून पुढे सुरू होणाऱ्या रंकाळ्याच्या सुरू होणाऱ्या कठड्यावर आजही आपल्याला गळ टाकून मासेमारी करणारे लोक दिसतील.
त्यानंतर रंकाळ्याचे जुने प्रवेशद्वार टॉवर चा परिसर लागतो. जुनी लोक सांगतात इथं उभारलं की आई अंबाबाई च दर्शन व्हायचं. आता सिमेंट च्या जंगलात ते झाकोळल गेलं आहे.
रंकाळा टॉवर अजूनही सुस्थितीत आहे. रंकाळा तलाव सुशोभित केलेली ब्रिटिशकालीन नोंद याठिकाणी कठड्यामध्ये आढळते. तिथुन पुढे राजघाट ते शालिनी पॅलेस पर्यत वॉकिंग ट्रॅक साकारला आहे . मॉर्निंग वॉक
साठी आजही कोल्हापूरकरांचे हे आवडते ठिकाण आहे. संध्याकाळी कोल्हापुरी अस्सल खवयांच्या येथील राजकमल भेळ , प्रियदर्शनी वड्यावर उड्या पडतात. भेळच्या प्रत्येक गाडीवर ऑल इंडिया स्पेशल भेळ राजाभाऊ च का लिहिलेलं असत हा बाहेरील पर्यटकांना पडलेला मोठा प्रश्न आहे.
शालिनी पॅलेसच रूपांतर हॉटेल मध्ये झालं आणि सध्यस्थितीत ही इतिहासकालीन वास्तू भकास आणि भयाण अवस्थेत बंद आहे. एके काळी या पॅलेसचे भव्य रूप करवीर संस्थानच एक जिवंत प्रतिक म्हणून गणल जायचं. शालिनी पॅलेस समोर नारळाच्या झाडांची एक रांग लागते. जुन्या काळात प्रेमी युगुलांसाठी एक आवडता स्पॉट म्हणून याची गणना होते. या नारळाच्या झाडावर कलाकारांनी छान कार्टून्स साकारली आहेत.
तिथून पुढचा अंबाई टॅंक चा परिसर संध्याकाळी घोडागाड्यांनी गजबजलेला असतो. पोहायला शिकायचं असेल तर अंबाई टॅंक गाठायचा अस हक्काचं ठिकाण या परिसरात आहे.
नवीन रंकाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठे व्यासपीठ साकारले आहे. व्यासपीठाच्या मागील भिंतीवर कोल्हापूर ची वैशिष्ट्ये दाखवणारी तैलचित्रे मोठ्या खुबीने साकारली आहेत.
तेथून पुढे पावसाळयात रंकाळा भरला की त्याचे पाणी परताळ्यातून फुलेवाडी कडे च्या ओढ्याकडे जायचे पण सध्या याचे अस्तित्वच दिसतं नाही. पर्यावरण अभ्यासकांच्या मते परताळ्यातून पाणी बाहेर सोडून ते कायम प्रवाहित केले पाहिजे अन्यथा रंकाळा भविष्यात सांडपाण्याचे डबके बनून मृतावस्थेत राहील. पावसाळ्यात या परताळ्याच्या पाटामध्ये छत्री धरून पकडलेले मासे आम्ही डोळयांनी पाहिलेलं आहेत. एवढी जैवविविधता या रंकाळामध्ये सामावलेली आहे.
परताळ्यापासून पोहायच्या खणीकडे जाणारा परिसर गर्द झाडीने व्यापलेला आहे. त्यातून जाणारा वॉकिंग ट्रॅक सुखद गारव्याची अनुभूती देतो. पण ट्रॅक ची दुरवस्था झाल्यामुळे प्रेमी युगुलांशिवाय येथे हल्ली फारसे कोणी फिरकत नाही. पोहायच्या खणीत उन्हाळयात बालचमुंची होणारी गर्दी इथे कायम आहे. येथील काठावर असणारे हनुमान आणि कृष्ण मंदिर जेष्ठ नागरिकांच्या गप्पांसाठी हक्काचे केंद्र झाले आहे.
पक्षी निरीक्षणं केंद्र जवळ वृक्षारोपण करून वृक्ष जतन केली आहेत हे निश्चितच समाधानकारक आहे.
रंकाळयाच सानेगुरुजी वसाहत कडील अखेरचं टोक म्हणजे इराणी खण जेथे 21 फुटी गणपती विसर्जन केलं जातं. या विसर्जनामुळे ही खण मरणासन्न अवस्थेत होती पण आता फ्लोअर फौंटंन कारंजा बसवल्यामुळे तिचे सोंदर्य खुलून आले आहे. कारंज्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिसळला जाऊन पाण्याची दुर्गंधी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे .हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मत्स्यबीज केंद्र चांगल्या प्रकारे सुरू होत पण दुर्देवाने ते आता पूर्णपणे बंद आहे.
तिथून पुढे राजकपूर पुतळ्यासमोर ब्रिज सहित बाग साकारली आहे. पश्चिमेला वाहणारे वारे झेलत या जुन्या वाशी नाक्या समोरच्या बागेत तसेच छोटेखानी ब्रिज वर तासनतास बसणं सुखद आहे. पेठेतली अनेक रस्सामंडळे या बागेच्या हिरवळीवरती रंगतात. या परिसरामध्ये खाद्याचा शोधात हजारो विदेशी पक्षी स्थलांतर करून येत असल्याचा नोंदी आहेत. त्यांना पाहणे हे नेहमीच विलक्षण असते. समोर असणाऱ्या पद्माराजे गार्डन मध्ये हे पक्षी विसाव्यास असतात.
चौथ्या भागात सगळ्यात चीड येणारी गोष्ट अनुभवास येते. तांबट कमानीतून महापालिकेने लावलेल्या बोर्ड वरील आदेश डावलून सर्रास म्हैसी व इतर जनावरे धुन्यासाठी रंकाळ्यात आणली जातात. कपडे धुणे तर नित्यनेमाने चाललेले असते. वर्षानुवर्षे चाललेली ही गोष्ट कधी संपुष्टात येते यावर रंकाळा ची पुढील अखंड वाटचाल असेल. नाहीतर जलपर्णी ( कोल्हापुरी भाषेत केंदाळाचा ) विळखा रंकाळाला पुन्हा पडायला वेळ लागणार नाही.....
शेवटी एवढेच सांगतो या रंकाळ्याशी एक जिवाभावाच नात जडलंय. सगळी सुख -दुःख, यश -अपयश या रंकाळ्याच्या लाटेसमवेत पचवली आहेत आणि भविष्यातही ही साथ सुटणार नाही. कळंबा आणि वडणगे तलावाच्या धर्तीवर रंकाळ्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. तरच येथील नैसर्गिक उमाळे जिवंत राहतील आणि पाण्याच्या शुद्धतेचा निकष उत्तम असेल.

उद्याच्या पिढीला हा वरील लिहिलेला सगळा निबंध काल्पनिक वाटायला नको एवढीच अपेक्षा आहे त्यामुळेच रंकाळा वाचवूयात एवढीच कळकळीची विनंती आहे समस्त करवीरवासीयांना...

आपला,
विक्रम दिपक रेपे
रंकाळा प्रेमी